मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील जी. जी. खडसे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एकक आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जून २०२५ रोजी ‘निर्मल वारी, हरित वारी, प्लास्टिक, थर्माकोल, कचरामुक्त वारी’ हे अभियान संत मुक्ताबाई मंदिरात, कोथळी येथे संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त राबवण्यात आले. या अभियानात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील आणि रासेयो संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी स्वयंसेवकांना व वारकऱ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.
कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून पर्यावरण संवर्धनाची उपयुक्तता उदाहरणांसह स्पष्ट केली आणि सर्वांनी यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले. रासेयो संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी ‘निर्मल वारी – हरित वारी’ ही संकल्पना समजावून सांगत, युवकांनी पर्यावरण संवर्धनात व सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन यांनीही उपस्थितांना पर्यावरण संवर्धनात हातभार लावण्याचा संदेश दिला.
या अभियानाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. डी. एन. बावस्कर यांनी केले. त्यांनी अभियानाच्या आयोजनामागील भूमिका व महत्त्व विशद केले. या अभियानांतर्गत आषाढी वारी प्रस्थान सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांच्या भोजनासाठी महाविद्यालयाने पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी ७००० केळीची पाने व ५००० कागदी ग्लास उपलब्ध करून दिले.
यावेळी डॉ. संजय शिंगाने (धरणगाव), डॉ. जयंत नेहते (ऐनपुर), श्री. शिवाजी पाटील, श्री. वैभव बाविस्कर यांची उपस्थिती लाभली. महाविद्यालयातील १०५ रासेयो स्वयंसेवकांनी या सोहळ्यात आलेल्या वारकऱ्यांना विविध सेवा पुरवण्यासाठी सक्रिय सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. कृष्णा गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. कल्याणी वडस्कर हिने केले.
या अभियानाप्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. संजीव साळवे, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि १०५ स्वयंसेवकांनी सक्रियपणे सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी केला. या अभियानामुळे ‘स्वच्छ वारी, हरित वारी’चा संदेश प्रभावीपणे पोहोचला आणि वारकऱ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली.