चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान” अंतर्गत चोपडा तालुक्यातील अडावद मंडळातील ९ गावांकरिता अडावद येथील ७ क्षत्रिय माळी समाज मंगल कार्यालयात एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाला.
आ.आण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार सोनवणे यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. अनेक गरजू नागरिकांना विविध योजनांची प्रमाणपत्रे आणि धनादेश त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
शिबिरादरम्यान नागरिकांनी रेशन आणि घरकुल योजनेसंबंधीच्या त्यांच्या तक्रारी आमदार सोनवणे यांच्यासमोर मांडल्या. आमदारांनी तात्काळ या तक्रारींची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच त्या सोडवण्याचे निर्देश दिले. अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण केल्यामुळे उपस्थित लाभार्थ्यांनी आमदार आणि प्रशासनाचे आभार मानले. राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, शासकीय सेवा थेट त्यांच्या दारी पोहोचल्याने समाधान व्यक्त होत आहे.