अडावद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा येथील नवीन शैक्षणिक वर्षाला उत्साहात सुरुवात झाली असून, शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यामध्ये नवीन उत्साह निर्माण व्हावा, या उद्देशाने अडावद येथील शामराव येसो महाजन विद्यालय आणि आदर्श प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
गुलाबपुष्प आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप
१६ जून रोजी सकाळी ८ वाजता श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित आदर्श प्राथमिक शाळेत, तर दुपारी १२ वाजता शामराव येसो महाजन विद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष वासुदेव महाजन आणि सचिव रमेश पवार यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव साजरा झाला. शाळेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. पहिली आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मान्यवरांच्या हस्ते दप्तर आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले. तसेच, पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कोरी करकरीत पुस्तके हातात पडल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होते.
शाळांची सजावट आणि मान्यवरांची उपस्थिती
यावेळी प्रत्येक वर्गखोली केळीच्या खांब आणि पताकांनी सुंदरपणे सजवण्यात आली होती, ज्यामुळे शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमात शामराव येसो महाजन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. के. पिंपरे, उपशिक्षक एन. ए. महाजन, व्ही. एम. महाजन, एस. जी. महाजन, एम. एन. माळी, पी. आर. माळी, एस. बी. चव्हाण, एस. के. महाजन, पि. एस. पवार, लिपिक सी. एस. महाजन, ईश्वर मिस्तरी, रवींद्र महाजन, कैलास महाजन, अशोक महाजन उपस्थित होते. आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डि. बी. महाजन, आर. जे. महाजन, एस. टी. महाजन, वाय. एल. साळुंखे, डि. आर. वाघ, कामिनी चौधरी, पूनम सुतार यांच्यासह ग्रामस्थ, पालक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.