धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन देण्यासाठी खान्देश प्रवासी असोसिएशनच्या वतीने धरणगावातील शाळा आणि महाविद्यालयांमधील दहावी आणि बारावी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवार, १ जून रोजी आदिनाथ दिगंबर जैन मंदिर हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विक्रम ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. आर. एन. महाजन सर होते. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर भगवान महाजन आणि धरणगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार उपस्थित होते. या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रा. आर. एन. महाजन सर यांनी विद्यार्थ्यांप्रती पालकांची जबाबदारी आणि विद्यार्थ्यांचे मनोबल कसे वाढवावे, यावर उदाहरणांसह विस्तृत मार्गदर्शन केले. मा. श्री. भगवान भाऊ महाजन यांनी विद्यार्थ्यांना पालकांच्या दबावात न येता, आपल्या क्षमतेनुसार आपले क्षेत्र निवडण्याचा सल्ला दिला. तसेच, उच्च शिक्षण घेतल्यानंतर परदेशात न जाता आपल्या देशातच राहून आपल्या गावाचे नाव उंचवावे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी, विद्यार्थी घडवण्यामागे शिक्षकांची (गुरु) महत्त्वपूर्ण भूमिका आणि करिअरच्या विविध संधी याविषयी मार्गदर्शन केले.
उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या वतीने अनुष्का बडगुजर आणि प्रांजल भावसार यांनी मनोगत व्यक्त केले. पालकांच्या वतीने सचिन भावसार, तर शिक्षकांच्या वतीने प.रा. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक जी. आर. सूर्यवंशी यांनी आपले विचार मांडले. सर्व मान्यवरांनी खान्देश प्रवासी असोसिएशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक जैन यांनी केले, तर प्रास्ताविक ऍड. नंदन पाटील यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खान्देश प्रवासी असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश तिवारी, उपाध्यक्ष चंद्रकांत भावसार, सचिव श्रेयांस जैन, सहसचिव ऍड. नंदन पाटील, खजिनदार प्रतीक जैन आणि संस्थेचे मार्गदर्शक सदस्य दिनेश पाटील, युवराज रायपूरकर, प्रशांत भाटिया, नारायण महाजन, रावसाहेब पाटील, जतीन नगरिया यांनी अथक परिश्रम घेतले.