जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर योजना २०२५ अंतर्गत आज जामनेर तालुक्यातील फत्तेपूर महसूल मंडळात ग्रामपंचायत मंगल कार्यालय, फत्तेपूर येथे समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विविध विभागांचा सहभाग, ३६९ लाभार्थ्यांना लाभ
या शिबिरात विविध विभागांच्या संयुक्त सहभागातून एकूण ३६९ लाभार्थ्यांना थेट सेवा व लाभ वितरित करण्यात आले. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत १७० लाभार्थ्यांना थेट डीबीटीद्वारे लाभ देण्यात आला, तर ॲग्रीस्टॅक नोंदणी ५ नागरिकांची झाली. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत ३९ नागरिकांना विविध सेवा पुरवण्यात आल्या. पुरवठा विभागामार्फत १०७ लाभार्थ्यांना शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या.
दाखले वाटप आणि ग्रामीण भागासाठी उपयुक्तता
या शिबिरात सेतू केंद्रामार्फतही विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये उत्पन्न दाखले १६, जातीचे दाखले १४ आणि वय, अधिवास व रहिवास दाखले १८ यांचा समावेश होता. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या दारातच शासकीय सेवा सहज उपलब्ध झाल्या आहेत. शासनाच्या योजना व सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या दृष्टीने हे समाधान शिबिर अत्यंत उपयुक्त ठरल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.