मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात असलेले एकमेव सुलभ शौचालय काही दिवसांपूर्वी पाडण्यात आल्याने नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे. हे शौचालय पाडल्यानंतर नगरपंचायतीने अद्याप दुसरे पर्यायी शौचालय बांधलेले नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिक, अबालवृद्ध आणि शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शौचास कुठे जावे, असा प्रश्न पडला आहे. या गंभीर समस्येकडे नगरपंचायतीचे लक्ष वेधण्यासाठी आज (सोमवार) अॅड. राहुल पाटील यांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीला निवेदन दिले.
मुक्ताईनगर शहर आधीपासूनच अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. त्यात आता सुलभ शौचालयाच्या अभावाची भर पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नगरपंचायत नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात कधी जागे होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. तातडीने नवीन सुलभ शौचालय बांधण्याची मागणी अॅड. पाटील यांनी निवेदनात केली आहे, जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल.