यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आपल्या गायनकलेसह समाजसेवा, सामाजिक बांधिलकी आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याच्या जोरावर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपास आलेले यावल येथील डॉ. डिगंबर सिताराम तायडे व सौ. शकुंतला डिगंबर तायडे हे तायडे दाम्पत्य नुकतेच दुबई येथे “आंतरराष्ट्रीय प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व पुरस्कार-२०२५” (इंटरनॅशनल इन्फ्लुएन्सर लीडर्स अवॉर्ड) ने गौरविण्यात आले आहे. या गौरवामुळे तायडे दाम्पत्याच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दुबई येथे पार पडलेल्या इंडो-यूएई ॲवार्ड समिती, वाधवन ॲवार्ड कौन्सिल आणि स्टेक ख्रिस एलीयॅट ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “इंटरनॅशनल इन्फ्लुएन्सर लीडर्स ॲवार्ड-२०२५” या कार्यक्रमात तायडे दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना दुबईचे महामहीम डॉ. बु अब्दुल्ला, डॉ. अनवर हमीम, बिझनेस वुमन सिल्विया बोटीनी, प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत आणि रेमी सेन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विविध देशांतील प्रतिनिधी आणि क्षेत्रीय मान्यवरही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. डिगंबर तायडे व शकुंतला तायडे या दाम्पत्याने गायन, समाजसेवा, आरोग्य उपक्रम, स्वच्छता मोहिम, शैक्षणिक कार्यक्रमांतील सहभाग अशा अनेक क्षेत्रात आपली ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत आजवर त्यांनी ५० पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ट्रॉफी, पदके, प्रमाणपत्रे आणि पुरस्कार मिळविले आहेत. भारतात अशा स्वरूपाची सन्मानप्राप्त जोडी म्हणून त्यांचा लौकिक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सन्मान-२०२५ अंतर्गत शकुंतला तायडे यांना “मल्टी ट्रेंड वुमन अचिव्हर ऑफ द इयर-२०२५” तर डॉ. डिगंबर तायडे यांना “इन्फ्रास्ट्रक्चर एक्सलन्स अँड कल्चरल इम्पॅक्ट अवॉर्ड-२०२५” ने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांनी इंटरनॅशनल सिल्व्हर स्क्रीन फिल्म अवॉर्ड-२०२४-२५, महाराष्ट्र अभियान पुरस्कार-२०२५ आणि आंतरराष्ट्रीय गायन स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार यासारख्या अनेक गौरवांचे मानकरी ठरले आहेत. त्यांच्या कार्याचा मुख्य गाभा हा समाजप्रेम आणि सेवाभाव आहे. अनाथ आश्रमांना दान देणे, आरोग्य सेवा, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग यामुळे ते समाजात एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.