जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील प्रसिद्ध गोलाणी मार्केटमधील ‘पूजा मोबाईल शॉपी’त मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या चोरीचा शहर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे तीन महागडे मोबाईल जप्त केले आहेत. या टोळीतील एक संशयित मात्र अद्याप पसार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
१२ मे रोजी पहाटेच्या सुमारास गोलाणी मार्केटमधील ई-विंगमधील पूजा मोबाईल शॉपी या दुकानात चोरट्यांनी ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना विशेष सूचना दिल्या होत्या.
या सूचनांनुसार, पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक विशेष पथक तयार केले. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिखरे, सफौ सुनील पाटील, पोहेकॉ संतोष खवले, उमेश भांडारकर, सतीश पाटील, भास्कर ठाकरे, किशोर निकुंभ, योगेश पाटील, अमोल ठाकूर, राहुल पांचाळ आणि प्रणय पवार यांचा समावेश होता.
पथकाने घटनास्थळी मिळालेले पुरावे आणि त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान, ही चोरी समीर युसूफ शेख (वय-१९, रा. पिंप्राळा हुडको), अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटीक (वय-२०, उस्मानिया पार्क, उमर कॉलनी) आणि अनिल उर्फ मारी भगवान सोनवणे (वय-१९, रा. पिंप्राळा हुडको) या तिघांनी मिळून केल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित समीर शेख आणि अबरार उर्फ चिरक्या खाटीक यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी केलेले तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.