पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर येथील सुप्रीम कंपनीतर्फे पत्रकार बांधवांच्या सुरक्षिततेसाठी एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत पत्रकारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम सुप्रीम कंपनीचे सर्वेसर्वा तापडिया यांच्या मार्गदर्शनाखाली, सीनियर जनरल मॅनेजर सुरेश मंत्री आणि कडगड, तसेच युनियन लीडर नयन जोशी यांच्या विशेष प्रयत्नातून यशस्वीपणे पार पडला. हा कार्यक्रम पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाला.
सुप्रीम कंपनीचे विविध सामाजिक उपक्रम
पहूर शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र लाठे यांनी प्रास्ताविकातून सुप्रीम कंपनीने सीएसआर फंडातून यापूर्वी केलेल्या विविध सामाजिक कार्यांची सखोल माहिती दिली. सुप्रीम कंपनीने यापूर्वी गाव स्वच्छतेसाठी पियाजो घंटागाडी, पाणीटंचाई असताना एक हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या, तसेच तीव्र पाणीटंचाई असताना दररोज २० हजार लिटरचे चार टँकर पाणी पुरवून पहूरकरांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला आहे. याव्यतिरिक्त, कोविड महामारीच्या काळात पहूर ग्रामीण रुग्णालयासाठी ऑक्सिजन पाईपलाईन व मॉनिटर दिले आहेत. जामनेर, नेरी, फत्तेपूर येथे लाखो रुपये खर्चून सुसज्ज शौचालये बांधून दिली आहेत. जनतेच्या हिताचे अनेक कार्य सुप्रीम कंपनीने पहूर गावासाठी केले असल्याचे लाठे यांनी सांगितले.
कार्यक्रमाची रूपरेषा आणि मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे होते, तर सरपंच अबू तडवी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रवींद्र लाठे यांच्या प्रास्ताविकाने झाली. यानंतर राजधर पांढरे व नयन जोशी यांनी पत्रकारांच्या कार्याची महत्ता आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या गरजेवर भर देत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पहूर येथील रवींद्र घोलप, शंकर भामरे, प्रवीण कुमावत, किरण जाधव, सादिक शेख, डॉ. संभाजी क्षीरसागर, ईश्वर हिवाळे यांच्यासह सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेचे उपाध्यक्ष जयंत जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. सुप्रीम कंपनीचा हा उपक्रम सामाजिक भान ठेवणारा आणि प्रेरणादायी ठरला असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांमधून उमटली.