जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातून चोरली गेलेली मोटरसायकल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत शोधून काढली आहे. या प्रकरणी दोन सराईत आरोपींना शनिवारी ७ जून रोजी दुपारी ३ वाजता रामानंद नगर पोलीसांनी अटक करण्यात आली असून, गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नईम खान मुकीम खान (रा. पिंप्राळा, हुडको, जळगाव) यांची मोटरसायकल २४ मे रोजी चोरीला गेली होती. या घटनेनंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असताना, गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अझहरूद्दीन सलीम शेख (वय १९, रा. पिंप्राळा, सध्या पाळधी, ता. धरणगाव) या संशयिताचा शोध घेण्यात आला. शुक्रवारी ६ जून रोजी दुपारी ३ वाजता शोधमोहीम राबवून त्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान अझहरूद्दीनने कबूल केले की, त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार अब्रार हमीद खाटीक (वय २०, रा. उमर कॉलनी, उस्मानिया पार्क, जळगाव) याच्यासोबत केला होता.
अब्रार हा यापूर्वीच एका गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. तो कारागृहातून सुटताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली असून, पुढील तपासासाठी रामानंदनगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे हे करत आहेत.