जळगाव-लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद येथे शनिवारी (३१ मे) दुपारी कौटुंबिक वाद झाल्यानंतर सारिका डिगंबर वाघुळदे (वय ३०) या विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथे सारिका वाघुळदे या त्यांचे पती आणि दोन मुलांसह राहत होत्या. शनिवारी दुपारी पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला. या वादानंतर मालवाहू रिक्षाचालक असलेले पती घरातून बाहेर गेले. पती बाहेर गेल्यानंतर सारिका यांनी विष प्राशन केले.
ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच, त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे नशिराबाद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.